गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र : मराठी गझलेचा दिशादर्शक ग्रंथ
●●
● दिनेश डोंगरे, वडोदरा
.
श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला येथिल माजी प्राध्यापक, कवी-गझलकार आणि विवेचक अशी तिहेरी उपलब्धी ज्यांनी यशस्वीरीत्या मिळवली आहे असे श्रीकृष्ण राऊत ह्यांचा आणखी एक अभ्यस्त, यशस्वी उपक्रम म्हणजे १७ ऑगष्ट, २०२५ ला प्रकाशित ग्रंथ 'गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र ' (मराठी गझलेचे व्याकरण). ह्या पूर्वी
'गुलाल'(१९८९), 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते ' (२०१९), 'गुलाल आणि इतर गझला' (२०२०) हे त्यांचे तीन गझलसंग्रह तसेच 'चार ओळी तुझ्यासाठी ' (२००३, ब्रेल लिपित २००७), 'तुको बादशाह' (२०१५), 'एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला' कवितासंग्रह प्र.आ.२००१,दु.आ.२०१८), मेळघाटच्या कविता (२०२२) अशी एकूण आठ पुस्तके प्रकाशित झाले असून साहित्य लेखनासाठी त्यांना विविध संस्थाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश आणि साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती त्यांना प्राप्त झालेली आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. २००८ सालापासून दर वर्षी नियमित 'गझलकार सीमोल्लंघन ' ह्या ऑनलाईन वार्षिक अंकाची निर्मिती आणि संपादन करत आहेत. ह्या व्यतिरिक्त 'माझी गझल मराठी '
mazigazalmarathi.blogspot.com आणि ' गझलकार ' gazalkar.blogspot.com हे दोन इंटरनेट ब्लॉग्स तयार केले आहेत. गझलांसाठी त्यांची आवड, अभ्यास आणि निष्ठा ह्यावरून स्पष्ट दिसत आहे.
राऊत सरांशी माझा परिचय गझलकार मित्र हेमंत पुणेकर ह्यांनी घडवून आणला. त्यानंतर आम्ही फोन वर तसेच व्हॉट्सअपच्या माध्यमाने संपर्कात आहोत.
माझा जन्म जरी मराठी कुटुंबात झाला असला तरी गेल्या कित्येक पिढ्यांपासून आमचे वास्तव्य बडोदे (गुजरात ) येथे असल्याने मराठी भाषेशी संपर्क कमी झाला आहे. पण गुजराती आणि हिन्दी भाषेतून अधिकांश साहित्यसृजन झाले आहे. आतापर्यंत सहा गुजराती गझलसंग्रह, दोन हिन्दी गझलसंग्रह आणि इतर संपादन, आस्वाद-अवलोकन अशी एकूण पंधरा पुस्तके प्रकाशित केल्यानंतर मनात काहीतरी खुपल्या सारखं वाटत होतं, की आपल्या मातृभाषेत सुद्धा साहित्य लिहावे आणि अशा रीतीने मराठी गझल लेखनाची सुरुवात झाली. हेमंत पुणेकर(पुणे), सौ दिपाली वझे (बेंगळुरू), सौ अंजलीताई मराठे, सौ मानसी म्हस्कर (बडोदे) ह्या मराठी-गुजराती दोन्ही भाषेच्या संपर्कात असलेल्या साहित्यकार मित्रांच्या प्रोत्साहनाने मराठी गझल लेखनाला अधिक उत्तेजन मिळाले.
माननीय राऊत साहेबांनी मला त्यांच्या ह्या नवीन पुस्तकाची माहिती दिली आणि मी लगेच नोंदणी केली. मला त्यांच्या स्वाक्षरीसह ते पुस्तक मिळाले. महिनाभर पुस्तकाचा संपूर्ण अभ्यास केल्यावर मला पुस्तकाविषयी मनोगत लिहावेसे वाटले म्हणून हे लिहीत आहे. पुस्तकाच्या प्रारंभी डॉ. अविनाश सांगोलेकर साहेबांची प्रस्तावना मयुरपंखासारख्या सुंदर प्रवेशद्वारासारखी सामोरी येते. ह्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर मला विशेषतः मराठी गझलेचे छंद:शास्त्र आणि लवचिकता दोन्ही अवगत झाले. तसेच उर्दू, गुजराती आणि मराठी गझल लेखनातला तात्विक फरक सुद्धा स्पष्ट झाला. मी उर्दू-हिन्दी, गुजराती गझल लेखन विपुल प्रमाणात केलं असलं तरी मराठी गझलसृजन खूप कमी आहे. माझ्या मराठी गझल लेखनास राऊत सर आणि त्यांचे पुस्तक खूप उपयोगी, गती देणारे ठरेल हे मात्र निर्विवाद आहे. तंत्रशुद्धता आणि तंत्रशरणता ह्यातली मूलभूत तत्त्वे ह्या पुस्तकातून स्पष्ट होतात असं लिहिले तर अतिशयोक्ति नाही.
उर्दू, हिन्दी, गुजराती भाषेत गझलेचे छंद:शास्त्र सोप्या, सरळ भाषेत सोदाहरण आहेच. मराठी भाषेत यापूर्वी डॉ. माधवराव पटवर्धन, आनंदकुमार आडे ह्यांनी हे काम केलं आहे. पण त्याला तांत्रिकदृष्ट्या मर्यादा असल्याने त्यात लवचिकतेला फारसा वाव नाही. तंत्रशुद्धता आवश्यक असली तरी उत्तम कविता/गझल पूर्णतया तंत्रात अडकून बसली तर कृत्रिमता निर्माण होईल. उत्तम गझलसृजनासाठी लवचिकता पण आवश्यक आहे, अशी साधी समज सर्वप्रथम ह्याच पुस्तकातून प्राप्त होते हे ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे.
एकूण २७६ पृष्ठांच्या हा दर्जेदार ग्रंथ, प्रस्तावना आणि भूमिका वगळता पारंपरिक संज्ञाचे अर्थ, संस्कृत छंद:शास्त्र आणि अरबी-फारसी अरुज : तुलनात्मक विश्लेषण, प्रारंभिक मराठी गझलेची अरबी-फारसी वृत्ते, गझलेची वृत्ते, गझलेच्या वृत्तांचे वर्गीकरण, गझलेच्या वृत्तांमधील लवचिकता, क़ाफिया, रदीफ, शेर, आणि गझलेची भाषा अशा ११ वेगवेगळ्या प्रकरणात विभाजित केला आहे. ग्रंथाच्या शेवटी ६ परिशिष्टांमध्ये सुरेश भटांच्या गझलांची वृत्तांचे सांख्यिकीय विश्लेषण, संग्रहनिहाय सुरेश भटांच्या गझलांची वृत्ते, वृत्तानुसार सुरेश भटांच्या गझलांच्या मतल्यांची सूची, मराठी गझल: काही गैरसमज, वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि संदर्भग्रंथ अशी पूरक माहिती देऊन शेवटी लेखकाचा परिचय दिला आहे.
सुरुवातीला गझलचे बाह्य अंग जसे मतला, काफिया, स्थिर अक्षर, अलामत, रदीफ, गझलची जमीन, शेर, उला मिसरा, सानी मिसरा, मक्ता, गझलचे प्रकार, ह्याची प्राथमिक माहिती देऊन नंतर लेखक क्रमशः गझलच्या अंतरंगाकडे वळतात. संस्कृत छंद:शास्त्र आणि अरबी-फारसी अरुज : तुलनात्मक विश्लेषण ह्या प्रकरणात लेखकाने छंदःशास्त्र निर्मितीचा कालखंड दर्शवून दोन्ही शास्त्रातील गण विभाजन आणि तात्विक फरक दाखवला आहे.
प्रारंभिक मराठी गझलेची अरबी-फारसी वृत्ते, गझलेची वृत्ते, गझलेच्या वृत्तांचे वर्गीकरण ह्या प्रकरणांत लेखकाने वृत्तांची सखोल माहिती देऊन, उर्दू, हिन्दी आणि मराठी नामांकित गझलकारांच्या मतल्यांची नोंद घेऊन सोदाहरण सविस्तर चर्चा केली आहे ; जी नवोदित मराठी गझलकारांसाठी खूप उपयोगी ठरेल. गझलेच्या वृत्तांमधील यतिस्थान, काफिया, रदीफ, शेर, गझलेची भाषा ह्या प्रकरणांत लेखकाने गझलच्या प्रत्येक अंगाचे सोदाहरण शास्त्रीय विवेचन करून नवोदित गझलकारांना अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजावले आहे. काफियांचे विविध प्रकार, काफियाची शुद्धता, क़ाफियांचे दोष, एकाक्षरी रदीफ, एका शब्दांचा रदीफ, शब्द समुहाचा रदीफ, रदीफ शिवाय (गैरमुरद्दफ) गझल, शेरच्या उला आणि सानी मिसरा यामधील सायुज्य (Sincronization), उत्तम शेराची लक्षणे, गझलेत शेरांची संख्या, तगज्जुल, अंदाजे बयां (अभिव्यक्तिची लाक्षणिकता) अशा अनेक लहान लहान परंतु महत्त्वाच्या गोष्टींची विस्तृत माहिती लेखकाने ह्या ग्रंथात देऊन सविस्तर, सोदाहरण चर्चा केली आहे.
नव्या गझलकारांना मार्गदर्शन आणि दिशा दाखवणारा हा ग्रंथ मराठी गझलचे अनमोल रत्न ठरेल ह्यांत तीळमात्र शंका नाही. राऊत साहेबांचे ह्या साठी जेवढे कौतुक आणि अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे. त्यांचे पुन:पुन्हा मनापासून
अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
....................................................................................
● गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र
● लेखक : डॉ. श्रीकृष्ण राऊत
● प्रकाशक : स्वयं प्रकाशन, सासवड, पुणे
● पृष्ठे : २७६,
● किंमत : ४०० रुपये
....................................
दिनेश डोंगरे 'नादान'
विश्वस्त प्रेमानंद साहित्य सभा आणि संयोजक बुधसभा
कॊर कमिटी प्रमुख, जयंतोर्मि साहित्य सेवा ट्रस्ट बडोदे, गुजरात
मो.नं.९८९८३४६८७७

No comments:
Post a Comment