Showing posts with label मराठी गझलेचा दीपस्तंभ : डॉ. संजय पोहरे. Show all posts
Showing posts with label मराठी गझलेचा दीपस्तंभ : डॉ. संजय पोहरे. Show all posts

मराठी गझलेचा दीपस्तंभ : डॉ. संजय पोहरे


 लोकमत

पुस्तक समीक्षण

'गझलेचे उपयोजित छंदशास्त्र' मराठी गझलेचा दीपस्तंभ

- प्रा. डॉ. संजय पोहरे

मराठी विभाग प्रमुख, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला
.
साहित्याच्या विश्वात काही साविषय असे असतात की, ज्यांचा उल्लेख झाला की रसिक थोडेसे मागे हटतात -छंदशास्त्र, व्याकरण, भाषाशास्त्र हे त्यापैकीच. हे विषय कोरडे, अवघड आणि फक्त संशोधकांसाठी असल्याची एक सर्वसामान्य धारणा आहे. पण, डॉ. श्रीकृष्ण राऊत यांचे 'गझलेचे उपयोजित छंदशास्त्र' हे पुस्तक त्या सर्व भ्रमांचा भंग करते. हे पुस्तक वाचकाला केवळ शास्त्र शिकवत नाही, तर त्याला गझलेच्या आत्म्याशी परिचित करून देतं.

डॉ. राऊत यांचा ग्रंथ जणू प्रकाशाची दिशा दाखवणारा दीप बनतो. पुस्तकाचे शीर्षकच त्याचा आशय सांगते - "उपयोजित" म्हणजे केवळ सैद्धांतिक नव्हे, तर व्यवहारात उपयुक्त. डॉ. राऊत यांनी छंद, काफिया, रदीफ यांसारख्या तांत्रिक गोष्टी इतक्या साध्या भाषेत स्पष्ट केल्या आहेत की वाचकाला त्या गुंतागुंती वाटत नाहीत. त्यांनी गझलेच्या तांत्रिक चौकटीला मान देतानाच तिच्या भावनिक आणि कलात्मक अंगालाही समान महत्त्व दिले आहे. गझल म्हणजे केवळ शिस्त नव्हे, ती एक शिस्तीतली उन्मुक्तता आहे. डॉ. राऊत म्हणतात -गझल 'वृत्तात' असली पाहिजे, पण 'वृत्तीने' मुक्त असली पाहिजे! हा विचारच त्यांच्या पुस्तकाची ओळख आहे.

योगदानाची परंपरा

डॉ. राऊत यांचे कार्य अधिक व्यापक आणि सखोल आहे. त्यांनी आपल्या ग्रंथाद्वारे मराठी गझलशास्त्राला सशक्त दिशा दिली. नवोदित गझलकारांना आत्मविश्वास दिला. संशोधकांना आधार दिला आणि सर्वसामान्य रसिकांना गझलेचे खरे सौंदर्य उलगडून दाखवले.

पुस्तकाचे वैशिष्ट्य

'गझलेचे उपयोजित छंदशास्त्र' या ग्रंथाची भाषा सोपी, प्रवाही आणि वाचकाला आपल्यात ओढून घेणारी आहे. प्रत्येक तांत्रिक संकल्पनेला लेखकाने उदाहरणांनी स्पष्ट केले आहे. गझलेतील वृत्त, मात्रा, गेयता, आणि आशयाच्या बांधणीविषयी त्यांनी दिलेले विश्लेषण अत्यंत मार्गदर्शक आहे. पुस्तक वाचताना गझल हा केवळ काव्यप्रकार नसून - ती एक विचारपद्धती, एक जीवनानुभव, एक कला आहे, हे उमगते.
.....................................................................................
दै लोकमत, अकोला
Page No. 6 
Oct 26, 2025