Showing posts with label गझलेचा छंद असलेल्यांसाठीचे उपयोगी शास्त्र : शैलेश महामुनी. Show all posts
Showing posts with label गझलेचा छंद असलेल्यांसाठीचे उपयोगी शास्त्र : शैलेश महामुनी. Show all posts

गझलेचा छंद असलेल्यांसाठीचे उपयोगी शास्त्र : शैलेश महामुनी

ज्येष्ठ गझलकार, गझल अभ्यासक डॉ. श्रीकृष्ण राऊत यांच्या 'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र' या उपयुक्त पुस्तकात लेखकाने गझल या काव्य प्रकारचा विचार करताना संस्कृत छंदःशास्त्रापासून ते अरबी, फारसी वृत्ते आणि मराठी गझलेची वृत्ते यांची सांगोपांग चर्चा केली आहे. सोबतच मराठी गझलेचा माधव जुलियन यांच्यापासून ते सुरेश भट आणि आत्ताची गझल याचा तांत्रिक बाजूने तपशीलवार आढावा घेतलेला आहे.

गझलेची वृत्ते या प्रकरणात त्यांनी दिलेली माहिती निर्दोष गझल लिहिणाऱ्यांनीही अचंबित व्हावे अशीच आहे. त्यांनी गझलच्या वृत्तांचे केलेले वर्गीकरण सोदाहरण असल्याने समजून घ्यायला सुलभ झाले आहे. छोटी, मध्यम आणि मोठी अशी एकूण ८२ वृत्ते त्यांनी सोदाहरण नोंदवली आहेत. त्यासोबतच ८ मात्रावृत्तेही समजावून सांगितली आहेत. त्यांनी हिंदी चित्रपट गीतांचीही वृत्ते दिली आहेत. मात्रा घटवणे, त्याचे नियम या बाबीही सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. रदिफ आणि काफिया या महत्त्वाच्या संज्ञा त्यांच्या प्रकारांसोबत विस्तृतपणे समजावून सांगितल्या आहेत.

या काव्यप्रकाराची तांत्रिक बाजू समजावून सांगताना लेखकाने अनेक अरबी, फारसी, उर्दू शब्दांचा अर्थ सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. शक्य तितक्या शब्दांना पर्यायी मराठी शब्द सुचविले आहेत. परंतु, विनाकारण ओढून ताणून पर्याय शोधण्याचा अट्टाहास केला नाही.

गझल लेखनामध्ये अनेक कारणांनी येणारे दोष दाखवून देतानाच उत्तम शेराची लक्षणे कोणती याचाही उहापोह लेखकाने केला आहे. विशिष्ट वाक्य, शीर्षक, संज्ञा किंवा शब्द किंवा एखादा उतारा, एखादे महत्त्वाचे मत याला आवश्यकतेनुसार ठळक करणे, अधोरेखित करणे आदी मुद्रण कलेतील क्लृप्त्या वापरल्या आहेत. ग्रंथामध्ये शेवटी दिलेली परिशिष्टे अत्यंत उपयुक्त आहेत. मराठी गझलेच्या संदर्भाने असलेले गैरसमज दूर केले आहेत. आधुनिक मराठी गझलेमध्ये होत असलेले बदल, त्यामुळे तिची वाढत चाललेली व्याप्ती याचा सकारात्मकतेने उल्लेख केला आहे. पाचव्या परिशिष्टामध्ये लेखकाने वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिली आहेत.

ग्रंथाला डॉ. अविनाश सांगोलेकर यांची गोळीबंद प्रस्तावना आहे. सुरेशकुमार वैराळकर यांनी ग्रंथाची पाठराखण केली आहे. सतीश पिंपळे यांचे मुखपृष्ठ अर्थपूर्ण आणि सूचक आहे.
__________________
◆ पुस्तक : गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र
◆ लेखक : श्रीकृष्ण राऊत
◆ प्रकाशक : स्वयंप्रकाशन, सासवड, पुणे
◆ पृष्ठसंख्या : २७६
◆ किंमत : र. ४००/-
◆ पुस्तकासाठी संपर्क :
श्रीकृष्ण राऊत
8668685288
.......................................
◆ दै. लोकमत, पुणे
दि. २० जुलै २०२६