मराठी गझलेचा बिलोरी आरसाः गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र
- सुरेश नागले
*******************
एखाद्या विधेवर सविस्तर प्रकाश टाकण्यापेक्षा त्या विधेचा सूक्ष्म अभ्यास करून त्याची तर्कशुद्ध मांडणी करणे, हे फार मोठे आव्हान असते. मात्र, वाचक आणि अभ्यासकांसाठी त्या विधेची शास्त्रशुद्ध माहिती खूप आवश्यक असते. थोडक्यात, गोंगाट आणि आतला आवाज यातला फरक समजला की झाले. हसत ,खेळत सहज बोलता आले पाहिजे, सांगता आहे पाहिजे. प्रसंगी बोजड भाषाशैली न वापरता सहज ओघवत्या भाषेत सांगितले की समजायला ते कठीण जात नाही. माहीत नसलेली एखादी गोष्ट माहीत झाली की तिचे नाविन्य संपुष्टात येत असते.श्रीकृष्ण राऊत यांच्या 'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र' या ग्रंथाचे मात्र तसे नाही. यातील प्रत्येकच प्रकरण पुनःपुन्हा वाचून काढावे असे वाटते. जितक्या वेळा तुम्ही वाचाल तितके नवीन काही प्राप्त होते. उदा. काफिया आणि त्याचे प्रकार, शुद्धाशुद्धता/ अस्पष्ट आणि स्पष्ट दोष याबद्दलची विस्तृत; पण नेमकी माहिती, मराठी गझलेच्या अनुषंगाने आलेले बारीकसारीक तपशील, 'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र' या ग्रंथात देण्यात आले आहेत.
मराठी गझल, कुठून आली - कशी आली. नेमके बाळसे धरून स्थिरावली कशी. सध्याची तिची परिस्थिती काय आहे. दिवसेंदिवस रुजत जाणारे तिचे अंतरंग आणि तिला दिवसेंदिवस मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद. तिने जपलेले सामाजिक भान या संबंधांत विस्तृत चर्चा या पुस्तकातुन करण्यात आली आली आहे. गझलेची वृत्ते, वृतांचे वर्गीकरण, त्यांच्यातील लवचिकता, गझलेच्या वृत्तांमधील यतिस्थान,काफिया, रदीफ, शेर, गझलेची भाषा आणि एकूण ५ परिशिष्टे असा भला मोठा अवाका, 'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र' या ग्रंथाचा आहे.
एखादी कलाकृती परिपूर्ण असावी, असा अट्टाहास धरताना त्यामागची धडपड, घेतलेले परिश्रम आणि अथांग व्यासंग हा ग्रंथ वाचताना ध्यानात येतो. पुस्तकातील साऱ्याच गोष्टी माहीत आहेत असे तयारीच्या वाचकांस वाटणे स्वाभाविक आहे. नेमके काय पाहिजे अन् काय असायला पाहिजे याचा सूक्ष्म अभ्यास लेखकाने इथे केल्याचे आवर्जून सांगावेसे वाटते. प्रसंगी पट्टीच्या गझलकारालाही हा ग्रंथ वाचल्यानंतर खूप काही प्राप्त झाल्याचा साक्षात्कार झाल्याखेरीज राहणार नाही. साऱ्याच गोष्टी माणूस प्रामाणिकपणे कबूल करत नाही ही बाब अलाहिदा! परंतू, या पुस्तकांतून आपण अमूक एक शिकलो, ह्या दृष्टीने नवोदितांसाठी ह्या ग्रंथातील हरेक ओळ अन् त्यातील प्रत्येक शब्द खूप महत्वाचे. प्रस्थापितांसाठी, प्रत्येक पानांतून एखादी गोष्ट तरी कामाची आहेच हे मनोमन वाटले तर फार आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. नवोदितासाठी घबाड अन् प्रस्थापितांना लावलेला कासरा या ग्रंथातून सहज दिसून येतो. एखाद्या विधेच्या नादी लागून तिच्याशी समरस होणे व अख्खी हयात तिचे बारकावे समजून घेण्यासाठीची तपश्चर्या म्हणजे, श्रीकृष्ण राऊत यांचा 'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र' हा ग्रंथ होय.
'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र' या ग्रंथात ५ व्या परिशिष्टात 'वारंवार विचारले जाणारे प्रश्न' या अनुषंगाने सुंदर असे मार्गदर्शन करण्यात आले आहे. गझलेला शीर्षक असावे का? प्रत्येक गझलेमध्ये मक्ता असतो का? मतलाबंद गझल म्हणजे काय? हझल म्हणजे काय? सर्वसामान्य व्यक्तीला व नवोदिताला भेडसावणारे हे प्रश्न व त्याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. जगरहाटीत, काही गोष्टी खूप साध्या सोप्या वाटत असतात; पण त्याच खूप कठीण असतात. गझल तर लिहून झाली हिला शीर्षक देऊ की नको? अन् द्यायचेच तर काय द्यायचे, असा संभ्रम पडण्याचे आता काही एक कारण नाही. आपण लिहिलेल्या गझलमध्ये 'मक्ता' असणे आवश्यक आहे का? वा तो टाळता येऊ शकतो का ? गझल मतलाबंद कशी असते. गझलसंंग्रह आणि 'दीवान' यातील नेमका फरक छान समजावून सांगितला आहे. विशेषतः 'इस्लाह' चे बाबतीत मौलिक माहिती देताना श्रीकृष्ण राऊत यांनी वैयक्तिक अनुभव विशद केला आहे आणि तो खूप महत्वाचा आहे असे माझे प्रमाणिक मत आहे. प्रस्थापित गझलकारांचा, नवोदितांच्या बाबतीतला दृष्टिकोन कसा असावा हे इथे अपेक्षित आहे असे मला वाटते.
'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र' या ग्रंथावर वाचकांच्या अन् विशेषतः अभ्यासकांच्या उड्या पडणे स्वाभाविक होते. विविध माध्यमातून आजवर श्रीकृष्ण राऊत सरांना, वाचत आलेल्या वाचकांना, 'बाराखडी' नंतर परिपूर्ण अशी एखादी कलाकृती हवी होती. मराठी गझलेचे विद्यापीठ असणाऱ्या अधिकारी व्यक्तीने एखादा परिपूर्ण ग्रंथ निर्माण करावा असे माझ्यासारख्या अनेकांना खूप दिवसांपासून वाटत होते. शेवटी ईश्वरापर्यंत ती आर्जवं पोचली. एका सुंदर परिपूर्ण ग्रंथाची निर्मिती विधात्याने करून घेतली. मराठी गझलेच्या इतिहासात, 'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र' या ग्रंथाची नोंद सुवर्ण अक्षरांनी घेतली जाईल असा भरवसा आहे. यानंतरच्या गझल लेखनासाठी वाहून घेतलेल्या पिढ्यांसाठी हा ग्रंथ मार्गदर्शनपर मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही. अनेक ताकदीचे गझलकार निर्माण करण्याची क्षमता या ग्रंथात निश्चितच आहे. तव्दतच, प्रस्थापित गझलकारांनासुद्धा नवचैतन्याचे धुमारे फुटतील. समस्त रसिक चाहते, कविता - गझलप्रेमी श्रीकृष्ण राऊत सरांचे कायम ऋणी राहतील.
या ग्रंथासंबधी लिहावे तितके कमीच आहे. अक्षरशः लिहिणाऱ्याला कसावर लावणारा हा ग्रंथ आहे. काय लिहू अन् काय नको असे अगदी होऊन जाते. लहान मूल यात्रेत नेले की 'हे घेऊ का ते घेऊ' असे म्हणून हरखून जाते. तसेच ह्या ग्रंथाच्या बाबतीत होते. प्रत्येक पानावरील माहिती इतकी काटेकोर आहे की, गझल क्षेत्रातील एखादा पांगळा दुडूदुडू चालायला लागून कालांतराने धावायला लागला तर फार आश्चर्य वाटू नये. ग्रंथ संग्रही असणे व त्याची जमतील तशी पारायणे करणे गरजेचे आहे. काय अन् किती वाचले पेक्षा किती समजले, समज- गैरसमजाला फुली मारुन झाले की नाही, हे महत्वाचे! ज्या ग्रंथाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो आपल्या पुढ्यात अभ्यासायला मिळणे हे वेगळे समाधान निश्चितच आहे. या सर्वांगसुंदर- अभ्यासपूर्ण ग्रंथाची प्रस्तावना, डॉ. अविनाश सांगोलकरांनी लिहिली आहे. ते म्हणतात, 'असा हा ग्रंथ मराठी गझलविश्वासाठी निश्चितच उपकारक आणि दिशादर्शक ठरेल. ' आकर्षक असे मुखपृष्ठ, सतीश पिंपळे यांनी रेखाटले आहे.
--------------------------------------------------------------
* गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र
* लेखक -- श्रीकृष्ण राऊत
* प्रकाशक - स्वयं प्रकाशन
* पृष्ठे - २७६
* मूल्य- ४००/- रू.
-...................................................................................
सुरेश नागले. नेरूळ पू. नवी-मुंबई
दै. रायगड स्वाभिमान
दै . शब्दराज
पनवेल दि. ३ नोव्हेंबर २०२५





No comments:
Post a Comment