अनमोल मार्गदर्शक ग्रंथ : प्रा.डॉ. विनोद देवरकर


मराठी गझलवाङ्मयाचा विकास हा विसाव्या शतकातील साहित्यप्रवाहातील एक वैशिष्ट्यपूर्ण अध्याय मानला जातो. उर्दू-फार्सी परंपरेत जन्मलेली, अरबी अरुजच्या - छंदशास्त्राच्या छत्राखाली विकसित झालेली आणि अनेक शतकांच्या वाटचालीत सांगीतिक लय व भाववैविध्य लाभलेली गझल मराठीत विसाव्या शतकात स्थिरावली. गझल ही केवळ भावनांची अभिव्यक्ती नसून छंदशुद्धतेची कठोर शिस्त जपणारी एक काव्यरचना आहे. म्हणूनच तिच्या अभ्यासाला छंदशास्त्रीय चौकटीची आवश्यकता भासते. मराठीत छंदशास्त्राची परंपरा प्राचीन काळापासून आहे. पिंगलाचार्यांचे ‘छन्दःशास्त्र’, भट्टतोळी, केशवस्वामी इत्यादींनी संस्कृत व प्राकृत छंदांना नियमबद्धतेचा पाया दिला. परंतु गझल ही संस्कृतछंदांपेक्षा वेगळ्या परंपरेतील असल्यामुळे तिच्या अभ्यासाला स्वतंत्र दृष्टिकोनाची आवश्यकता होती. याच छंदवैज्ञानिक जाणीवेचा परिपाक म्हणून ‘गझलेचे उपयोजित छंदशास्त्र’ हा  श्रीकृष्ण राऊत यांचा ग्रंथ आपल्यासमोर येतो. हा ग्रंथ केवळ सैद्धांतिक विवेचनापुरता मर्यादित नसून, मराठी गझलकारांना उपयोजित दृष्टी देणारा, प्रत्यक्ष लेखनमार्ग सुचविणारा आणि संशोधकांना तुलनात्मक छंदशास्त्रीय परिप्रेक्ष्य उपलब्ध करून देणारा एक महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ आहे.

हिंदी-उर्दूत अरुजविषयक अनेक ग्रंथ पूर्वीपासून प्रचलित होते. माधव जूलियन यांचे ‘गज्जलांजलि’ (१९३३), माधवराव पटवर्धन यांचे ‘छन्दोरचना’ (१९३७) व तद्नंतर थेट कवी सुरेश भटांनी १९८३-८४ मध्ये ‘गझलेची बाराखडी’ लिहून गझलेच्या आकृतीबंधाचा परिचय करून दिला. नंतरच्या काळात हिंदी-मराठीत गझलेचे छंद:शास्त्र आपापल्यापरीने समजावून सांगण्याचे काही छोटे-मोठे प्रयत्न झालेत. त्यांनी चोखंदळ अभ्यासकांचे फारसे समाधान झाले नाही. या पार्श्वभूमीवर नुकताच प्रकाशित झालेला श्रीकृष्ण राऊत यांचा ‘गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र’ (२०२५) हा ग्रंथ मराठी गझलवाङ्मयाला शास्त्रीय, उपयोजित व चिकित्सक दिशा देणारा ठरतो.

या ग्रंथाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे लेखकाने गझलछंदविचार केवळ शास्त्रीय चर्चेपुरता मर्यादित ठेवलेला नाही. त्यांनी त्यास उपयोजितेची जोड दिली आहे. नवोदित कवीला गझललेखन करताना येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात मिळतात. त्याचबरोबर संशोधकाला गझलेच्या छंदवैज्ञानिक प्रवासाचे दस्तावेजीकरण येथे सापडते. राऊत यांनी आरंभी पारिभाषिक संज्ञांचे अर्थ सोप्या भाषेत स्पष्ट केले आहेत. वृत्त, गण, यति, काफिया, रदीफ यांसारख्या संज्ञा शास्त्रीय व उपयोजित अर्थांनी समजावल्या आहेत. छंदशास्त्र व अरुज यांची तुलनात्मक चिकित्सा करताना त्यांनी संस्कृत व फार्सी छंदपरंपरेतील साम्य - भेद विवेकीपणे दाखवले आहेत. संस्कृतछंद हा अक्षरगण व लघू ,गुरू मात्रांवर आधारलेला आहे, तर फारसी अरुज हा उच्चारातील ध्वनीनुसार  येणाऱ्या मात्रांवर आधारलेला आहे, हे स्पष्टीकरण गझल अभ्यासकाला विशेष उपयुक्त ठरते.

मराठी गझलेचा ऐतिहासिक प्रवास त्यांनी अठराव्या शतकापासून मांडला आहे. माधव जूलियन यांचे ‘गज्जलांजलि’, माधवराव पटवर्धन यांचे ‘छन्दोरचना’, तसेच विसाव्या शतकात सुरेश भटांनी केलेली गझलप्रवृत्तीची क्रांती यांचा विचार येथे येतो. सुरेश भटांनी मराठी गझलेला आत्मभान व आत्मभाषा दिली, तिच्या आशयविश्वाला आधुनिक वास्तवभान दिले, तर राऊत यांनी त्या गझलेच्या छंदवैज्ञानिक बाजूचे स्पष्टीकरण केले. विशेष म्हणजे या ग्रंथात अरबी-फार्सीतील एकावन्न वृत्तांचे संकलन केले आहे. त्यातून मराठी गझलकार कोणती वृत्ते आत्मसात करू शकतो. वृत्तांत लवचिकता कशी शक्य असते, कोणत्या वृत्तात यतिस्थान कसे निश्चित होते याची चर्चा केलेली आहे. वृत्तांचे वर्गीकरण ही या ग्रंथाची मौलिक देणगी म्हणावी लागेल. लघू, मध्यम, मोठी व मात्रावृत्ते असा विभाग करून गझलवृत्तांचा परिचय दिला आहे. प्रत्येक विभागात वृत्तांची नावे, त्यांचे वैशिष्ट्य, उदाहरणे व उच्चारपद्धतीचे निर्देश दिलेले आहेत. “गती तेथे क्रांती” हा सूत्रविचार विशेष लक्षवेधी आहे. उच्चारातील सूक्ष्म बदल वृत्तांवर कसा परिणाम करतात, हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह दाखवून दिले आहे. गझलकाराला या चर्चेतून निश्चित मार्गदर्शन मिळते.

गझलशास्त्रातील काफिया-रदीफ हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. राऊत यांनी काफियाचे स्थिर अक्षर, अलामत, स्वरकाफिया, जुलकाफिया असे भेद करून त्यांचा अभ्यास या ग्रंथात मांडला आहे. काफियातील शुद्धता-अशुद्धता, दोषांची वर्गवारी व पुनरावृत्तीचे परिणाम यांचे विवेचन केले आहे. त्याचबरोबर रदीफाचे प्रकार – एकाक्षरी शब्द, एक शब्द - शब्दसमूह हे स्पष्ट केले आहेत. काफिया-रदीफाच्या संदर्भात उर्दू-हिंदीतील उदाहरणांसह मराठी गझलांतील उदाहरणेही दिल्याने  वाचकाला प्रत्यक्ष प्रयोग लक्षात येतो.

शेरविषयक चर्चा करताना उत्तम शेराची लक्षणे, शेरांची संख्या, तगझ्झुल व अंदाजे बयाँ यांची चिकित्सा केली आहे. गझललेखन हे केवळ छंद:शास्त्रीय नियमांचे गणित नसून त्यात काव्यात्मता, नावीन्य व कलात्मकताही अपेक्षित असते, हा विचार त्यांनी “तंत्रासोबत मंत्र” या शब्दात मांडला आहे. गझलेच्या भाषेबाबत त्यांनी महत्त्वाचे विचार मांडले आहेत. गझलेची भाषा नेहमी कठीण असतेच असे नाही, ग्रामीण-बोलीतील शब्द वापरले तरी गझल प्रभावी होऊ शकते, इतर भाषांतील शब्द योग्य रीतीने वापरल्यास अभिव्यक्तीचे वैविध्य वाढते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

ग्रंथाच्या शेवटी परिशिष्टांचा समृद्ध ठेवा आहे. सुरेश भटांच्या गझलांचे वृत्तवार सांख्यिकीय विश्लेषण, संग्रहनिहाय सूची, वृत्तनिहाय सूची, मराठी गझलविषयी गैरसमज व वारंवार विचारले जाणारे प्रश्न – ही परिशिष्टे ग्रंथाला संशोधनात्मक भक्कमपणा देतात. त्यामुळे कवीला, वाचकाला आणि संशोधकाला ही परिशिष्टे मार्गदर्शक ठरणारी आहेत. मराठी गझलेचे छंदवैज्ञानिक दस्तावेजीकरण अशा प्रकारे प्रथमच या ग्रंथात केलेले दिसते.

या ग्रंथाची काही ठळक वैशिष्ट्ये अशी - तुलनात्मक दृष्टिकोन हे त्यातील प्रथम वैशिष्ट्य. संस्कृत छंद व अरुज परंपरेचा संदर्भ घेऊन राऊत यांनी छंदविचाराला अधिक सर्वंकष चौकट दिली आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे नियमांची उपयोजिता. केवळ सिद्धांत न मांडता त्यांनी नवोदित कवीला प्रत्यक्ष लेखनासाठी नियम व मार्गदर्शन दिले आहे. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे सांख्यिकीय दृष्टिकोन. सुरेश भटांच्या गझलांचे सांख्यिकीय विश्लेषण करून त्यांनी गझलशास्त्राला संशोधनपर आधार दिला आहे. चौथे वैशिष्ट्य म्हणजे भाषेची सुलभता. कठीण संज्ञा व तांत्रिक बाबी त्यांनी सोप्या, थोडक्यात व स्पष्ट भाषेत सांगितल्या आहेत. चिकित्सक दृष्टिकोनातून नोंद घेण्यासारख्या अनेक गोष्टी प्रस्तुत ग्रंथात दिसतात. जसे – प्रत्येक संज्ञा, संकल्पना अथवा विचार सोदाहरण मांडला आहे. प्रसंगी हिंदी उर्दूची प्रातिनिधिक उदाहरणे दिली आहेत. ज्यामुळे वाचकाला गझलपरंपरेचे सखोल आकलन होते. तसेच विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात माधवराव पटवर्धन यांनी लिहिलेल्या, तर  उत्तरार्धात आपल्या सकस गझलांनी आदर्श प्रस्थापित करणाऱ्या सुरेश भटांच्या गझलांच्या वृत्तानुसार मतल्याची सूची नवोदितांसाठी आकलनसुलभता प्रदान करते. नवोदित कवीला वृत्तनिवड, काफिया-रदीफाची काटेकोर मांडणी, यति-नियम यांचे स्पष्ट मार्गदर्शन येथे मिळते. या ग्रंथाची शास्त्रीय व उपयोजित मांडणी इतकी ठोस आहे की मराठी गझल छंद:शास्त्राच्या अभ्यासकाला, संशोधकाला तुलनात्मक छंद:शास्त्रीय संदर्भ मिळतो. विद्यार्थी व शिक्षकांसाठी हा ग्रंथ अभ्यासक्रमीय संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी ठरतो. 

एकंदरीत पाहता  श्रीकृष्ण राऊत यांचे ‘गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र’ हे पुस्तक मराठी गझलवाङ्मयाला मिळालेला एक मौलिक ठेवा आहे. हे पुस्तक मराठी गझलकारांसाठी दीपस्तंभाप्रमाणे असून गझललेखनाची तंत्रशुद्धता, छंदवैज्ञानिक शिस्त व काव्यात्मक सौंदर्य यांचा समन्वय साधून देते. छंदशास्त्राच्या परंपरेला गझलवाङ्मयाशी जोडणारा हा दुवा आहे. पूर्वसूरींच्या प्रयत्नांचा चिकित्सक आढावा घेत, अरबी-फार्सी अरुज व संस्कृतछंद यांची सांगड घालून, शास्त्रीयतेबरोबर उपयोजितेची जाण देणारा हा ग्रंथ मराठी गझल अध्ययनाच्या इतिहासात दीर्घकाळ स्मरणात राहील.


पुस्तकाचे नाव: गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र

लेखक : श्रीकृष्ण राऊत

मुखपृष्ठ : सतीश पिंपळे

प्रस्तावना : डॉ. अविनाश सांगोलेकर

पाठराखण : सुरेशकुमार वैराळकर

प्रकाशन : स्वयं प्रकाशन, सासवड, पुणे

पृष्ठ संख्या : २७६ किंमत : ४००/- रुपये

...............................

प्रा. विनोद देवरकर

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा 

संपर्क : ९४२१३५५०७३

No comments:

Post a Comment