स्वयं प्रकाशन पुणे यांच्याद्वारे प्रकाशित झालेले 'गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र' हा श्रीकृष्ण राऊत यांचा ग्रंथ म्हणजे संशोधनाच्या अंगाने जाणारा आणि गझलेचा आकृतीबंध, इतिहास व तिची वाटचाल विशद करणारा ग्रंथ. गझलेची फार्सी, उर्दू आणि मराठीतील भूमिका समजून घेण्यासाठी केलेलं हे महत्त्वपूर्ण लेखन आहे. श्रीकृष्ण राऊत हे स्वतः सिद्धहस्त गझलकार तथा गझलेचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांनी या ग्रंथाला शीर्षक देतानाच विषयाची स्पष्टता अधोरेखित केली आहे. त्या अनुषंगाने गझलेविषयीचे बारकावे पुस्तकात नोंदवले आहेत. मराठी गझलेच्या इतिहासाची एक प्रेरणादायी कहाणी, गझलेत काळानुसार झालेले बदल किती महत्त्वाचे होते व त्या बदलाचे तत्कालीन स्वरूप काय होते याचे नेमके वर्णन लेखकाने या ग्रंथात केले आहे. गझलेचा अरबी, फार्सी मधील जन्म त्यानंतर उर्दू, हिंदी, पंजाबी, गुजराती ते मराठी असा झालेला प्रवास, तिच्या परिवर्तनाची साक्ष देतो. गझलेची वृत्ते, मात्रा, लयबद्ध मांडणी. यती, अलामत, काफिया, रदीफ यांनी संपूर्णपणे तयार झालेली ‘जमीन’ ते गझलेच्या शेवटच्या शेरातील 'मक्ता' पर्यंत प्रत्येक घटकावर वस्तुनिष्ठ भाष्य लेखकाने केले आहे. लेखकाचे हे विश्लेषण विचारप्रवर्तक आहे.
अमृतराय, मोरेपंत, माधव ज्यूलियन, सुरेश भट यांच्या मराठी गझलेतील योगदानाने मैलाचे किती दगड गाठले आणि अजूनही भटांच्या गझला किती उपयुक्त आहेत हेही लेखकाने स्पष्ट केले आहे.
श्रीकृष्ण राऊत यांनी छंद :सूत्रे 'पिंगल' पासून अरबी, फारशी, 'अरुज' म्हणजे छंदशास्त्रातील वृत्तांमध्ये 'खलील बीन अहमद बसरी' यांच्या योगदानाची महत्त्वपूर्ण मांडणी करून संस्कृत छंदांसोबत फार्सी, अरबीतील लगावलीचे सोदाहरण केलेले विश्लेषण गझलेच्या अभ्यासकांना मोलाचे ठरावे असेच आहे.
प्रस्तुत ग्रंथात ८२ अक्षरगण वृत्तांचा सोदाहरण परिचय करून दिला आहे. त्यापैकी ५१ वृत्ते फारशी छंद:शास्त्रातील आहेत असेही सांगितले आहे. गझल लिहिणाऱ्याने वृत्ताच्या नावापेक्षा त्या वृत्ताची लगावली लक्षात घ्यावी. गझल वाचकाला आणि ऐकणाऱ्या रसिकाला त्या वृत्ताच्या लगावलीशी काही घेणेदेणे नसते हे सांगून नवगझलकारांना प्रेरणाही दिली आहे.
गझलरचनेच्या सर्व प्रकारच्या लेखनाचा आधार, इतिहास, गझलेतील बारकावे, अशा प्रत्येक बाबीसाठी स्वतंत्र मांडणी, अशी जी रचना लेखकाने या ग्रंथातून केली आहे. ती अतिशय सयुक्तिक आहे. 'गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र' हा ग्रंथ केवळ गझलेचे वरपांगी विश्लेषण नसून गझलेचा इतिहास, तत्वज्ञान आणि सामाजिकतेच्या त्रिवेणी संगमाची सफर आहे. हा ग्रंथ वाचकाला विचारप्रवण करतो, सध्याच्या काळातील गझल लिखाणाशी संवाद घडवतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गझले विषयी आपल्या मनात प्रश्न निर्माण करत त्या प्रश्नांची उत्तरेही देतो. गझलकारांनी गझलेतून जसा सुसंवाद केला, अनेक संदर्भांची कोडी उलगडून दाखविली, विस्तृत भाष्ये केली, त्याची चिकित्सक मांडणी श्रीकृष्ण राऊत यांनी केली आहे. सध्याच्या काळात गझलेचा प्रदूषित, खोटा इतिहास समोर येत असताना, गझलेची पूर्वापार धारणा आणि मिथके यांना छेद देणाऱ्या अनेक गोष्टी या ग्रंथातून मांडल्या आहेत. ही मांडणी आपल्याला विचार करायला भाग पाडते.
त्यातही मराठी गझलविश्वाला अधोरेखित करताना लेखकाने छंद:शास्त्र, स्वरांचे विभाग, वृत्तातील लवचिकता आणि मात्रा घटविण्याचे नियम हे उदाहरणासह दिले असल्याने गझलेच्या अभ्यासकांची अधिक सोय झाली आहे. उदाहरणादाखल वियद्गंगा वृत्तातील ‘दुष्यंतकुमार त्यागी’ च्या 'सायें में धूप’ मधील "ये सारा जिस्म झुक कर बोझ से दुहरा हुआ होगा", प्रभाव वृत्तामधील ‘हेमंत पुणेकर’ यांची "मी आरशासमोर जे सरसावले सतत", वृत्त वैशाख मधील ‘सुरेश ‘भटांची "इतना ही अपनी मौत पे बस माजरा हुआ", निदा फाज़लीच्या स्त्रग्विणी वृत्तातील "हर तरफ़ हर जगह बेशुमार आदमी" अशा दिग्गज गझलकारांच्या गझलांच्या उदाहरणांमुळे एकूणच वाचकाला गझल समजून घेण्याची सोय करून दिली आहे. सुरेश भटांच्या गझलांच्या वृत्तांचे सांख्यिकीय विश्लेषण आणि शेवटी वृत्तानुसार त्यांच्या गझलांची सूची दिल्याने या ग्रंथाची मौलिकता द्विगुणीत झाली आहे.
डॉ. अविनाश सांगोलेकर यांची प्रस्तावना आणि सुरेशकुमार वैराळकर यांच्या सारख्या गझलेच्या श्रेष्ठ अभ्यासकाची पाठराखण या ग्रंथाला अस्सलतेची मोहर लावते. या ग्रंथाच्या शेवटी संदर्भसूची दिल्याने श्रीकृष्ण राऊत यांचे समग्र संशोधन भान सिद्ध होतेच शिवाय ते गझलेच्या अभ्यासकांना नव्या अभ्यासासाठी दिशादर्शक ठरते. असा हा मराठी गझलेची मौलिकता आणि सर्जक अभ्यास सिद्ध करणारा खजिना ग्रंथरूपाने मराठी गझलेच्या क्षेत्रात देदीप्यमान केल्याबद्दल श्रीकृष्ण राऊत यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
------------------
गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र
लेखक : श्रीकृष्ण राऊत
प्रकाशक : स्वयं प्रकाशन, पुणे
पृष्ठे :२७६
किंमत : ४०० /-
.
( 'सर्वधारा ' त्रैमासिक, जाने - फेब्रु - मार्च २०२६ )




No comments:
Post a Comment