उत्तम गझल लिहिण्याचा कानमंत्र देणारा ग्रंथ : प्रतिभा सराफ

 




उत्तम गझल लिहिण्याचा 

कानमंत्र देणारा ग्रंथ : 

प्रतिभा सराफ 


गझलबद्दल नवोदितांबरोबरच प्रस्थापितांच्या मनातसुद्धा अनेक शंका असतात. त्याचे योग्य निरसन 'गझलेचे उपयोजित छंदः शास्त्र' या ग्रंथात श्रीकृष्ण राऊत यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक उत्तम गझलकार असलेल्या श्रीकृष्ण राऊत यांचा गझलेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव संपूर्ण ग्रंथातून जाणवतो. याशिवाय या ग्रंथाच्या निर्मितीसाठी त्यांनी पन्नासपेक्षा जास्त संदर्भग्रंथांचा वापर केलेला आहे, ज्याची यादीही यात समाविष्ट केलेली आहे.

     ह्या ग्रंथातील माहिती आणि तथ्ये नुसतीच संकलित केलेली नाहीत; तर तिचं साधार विश्लेषणही त्यांनी केलेलं आहे.

- अशा शब्दांत ज्येष्ठ गझलकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी आपले निरीक्षण नोंदवलेले आहे.

'गझलेची वृत्ते', 'गझलेच्या वृत्तांचे वर्गीकरण', 'गझलेच्या वृत्तांमधील लवचिकता', 'गझलेच्या वृत्तांमधील यतिस्थान', 'गझलेची भाषा' पर्यंत गझलेच्या संदर्भातील सर्व मुद्यांना या ग्रंथात स्थान दिलेले आहे.

गझल तंत्रानुगामी असल्यामुळे यातील गहन मुद्दे समजून घेताना ते जराही कंटाळवाणे होत नाहीत याचे कारण म्हणजे श्रीकृष्ण राऊत यांनी काही म्हणी, ओळखीच्या हिंदी-मराठी गाण्यांच्या ओळी, गझलेच्या संदर्भातील महत्त्वाच्या शब्दांच्या ठळक अक्षरात दिलेल्या व्याख्या तसेच गझल हा एक सर्जनशील साहित्यप्रकार कसा आहे, 'गझल' हा कवितेचा एक प्रकार आहे अशी विधाने उत्तमरीत्या सोदाहरण स्पष्ट केलेली आहेत.

मराठी गझलांमध्ये फारशी, अरबी, संस्कृत, हिंदी इंग्रजी इ. भाषांमधून आलेले शब्द आढळतात. त्यामुळे मराठी गझलेत इतर भाषांमधून आलेल्या शब्दांचे अर्थ आणि ते शब्द असलेले शेर हे दोन्ही उदाहरणादाखल ग्रंथात दिलेले आहेत. इथे श्रीकृष्ण राऊत यांनी असे मत मांडले आहे की गझलेत अमुक शब्द वापरू नये हे म्हणणे चुकीचे आहे. याउलट जर बोलीभाषेतील शब्दांनी गझल अधिक प्रभावी होत असेल, सर्वसामान्यांना उमजत असेल, वाचकांशी सहज संवाद साधत असेल; तर ती गझलेला व्यापकत्व देणारी ठरते.

गझलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी गझलेच्या तंत्राला न घाबरता याशिवाय कोणत्याही ज्येष्ठ गझलकाराचा गंडा न बांधताही उत्तम गझल लिहिण्याचा कानमंत्र या ग्रंथात श्रीकृष्ण राऊत यांनी दिलेला आहे.

हा ग्रंथ गझल लिहिणाऱ्यांसाठी सुस्पष्ट दिशा दाखवणारा झाला आहे, असे मत सुरेशकुमार वैराळकर यांनी अधिकारवाणीने मांडले आहे, यासाठी गझलच्या अधिक जवळ जाऊन त्याचा आनंद घेणाऱ्या गझलकारांसाठी त्याचबरोबर रसिकांसाठीही हा ग्रंथ महत्त्वाचा ठरणार आहे.

गझलेचे उपयोजित छंदः शास्त्र : श्रीकृष्ण राऊत.

स्वयं प्रकाशन, पुणे.

पृष्ठे: २७५, 

मूल्य: चारशे रुपये


ललित । मार्च २०२६



 

No comments:

Post a Comment